शंकराचार्यांनी लिहिलेली स्तोत्रे ही संस्कृत भाषेची आभुषणं आहेत. ही स्तोत्र, देवतेचे वर्णन केवळ शब्दानेच करत नाहीत तर त्या स्तोत्राचे स्वरूपही देवतेच्या भावाला सजेसे असते. मुदाकरात्त मोदकम् ची संथ चाल बघा अथवा शिवतांडव स्तोत्राची रुद्रगंभीर कडवी ऐका. अयि गिरीनंदिनी अथवा 'जटाटवि' हे लांबलचक आकाराने आणि लयीने उग्र वाटतात. मनीषापंचक, निर्वाणषटक त्यांच्यातल्या अद्वैतचर्चेने गंभीर आहेत. यापेक्षा वेगळे असे शंकराचार्यांचे अर्धनारीश्वर स्तोत्र मला फार आवडते. आठ श्लोकांचे शिवा आणि शिव यांचे वेगळेपण आणि तरिही त्यांचे अद्वैत रेखीवपणे उभे करते. प्रत्येक श्लोकाच्या पहिल्या ओळीचा प्रथम अर्ध शिवानीचं वर्णन करतो तर द्वितिय अर्ध शिवाचं. दुसऱ्या ओळीच्या पहिल्या अर्धाचे परत असेच दोन भाग, पहिला शिवेचा दुसरा शिवाचा. नमः या क्रियापदाला चतुर्थीची अपेक्षा असल्याने, शिवेची शब्दरुपे 'यै' कारान्त तर शिवाची 'य' कारान्त. चाम्पेयगौरार्धशरीरकायै कर्पूरगौरार्धशरीरकाय । धम्मिल्लकायै च जटाधराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ १ ॥ गौरीचा वर्ण चाफ्यासारखा सोनमाखला गोरा, तर शिव कर्पूरगौर. ...